दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं मुंबईत निधन

मुंबई : दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं आज मुंबईत वृद्धापकाळाने निधन झालं, ते 83 वर्षांचे होते. मेहेंदळे हे दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक, नंतर संपादक होते. 

डॉ. विश्वास मेहेंदळे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे माजी संचालक, पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे माजी प्रमुख, ‘ईएमआरसी’ चे संचालक होते. त्यांनी 38 हून अधिक पुस्तकांचं लेखन केलं. आठ एकपात्री प्रयोगांचे शेकडो प्रयोग केले. व्यावसायिक रंगभूमीवरही सात नाटकांचे एक हजारांहून अधिक प्रयोग केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेंहेदळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनानं पत्रकारिता क्षेत्राचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं असल्याचं, त्यांनी शोक संदेशात म्हटलं आहे.