विद्यार्थ्यांमधून नवीन संशोधक उदयास यावे : गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने 

अंबाजोगाई : विज्ञानामुळे जग झपाट्याने पुढे जात असल्याने विद्यार्थ्यांना विज्ञानाची जवळून ओळख व्हावी, यातून नवनवीन प्रयोग सर्वाना समजावे व आजच्या विद्यार्थ्यांमधून नवीन संशोधक उदयास यावे, हा विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्याचा उद्देश आहे, असे उद्गार येथील गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने यांनी काढले.

गटशिक्षणाधिकारी कार्यालय व व्यंकटेश विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी समृद्धी दिवाने बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी शेख चांद, पत्रकार दत्ता अंबेकर, शिक्षणविस्तार अधिकारी बी. के, नांदूरकर, मधुकर सुवर्णकार, एस. एम. कनाके, एम. के. पठाण केंद्रप्रमुख माणिक साळुंके, काटे, के. व्ही. कापसे, श्रीमती आयेशा हाश्मी, सोनटक्के एस. एम. पिंगळे एस.बी, जी. एन कांबळे, व्यंकटेश विद्यालयाचे मुख्याध्यापक धनंजय शिंदे आदींची उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना समृद्धी दिवाने म्हणाल्या की, आमचं स्वागत सांस्कृतिक परंपरेने केलं. मात्र संस्कृतीला जोड ही विज्ञानाचीच असायला हवी. आज विज्ञानामुळेच मोबाईलचा शोध लागला. मोबाईलचे जेवढे फायदे तेवढेच तोटे असुन या मोबाईलमधून चांगलं काय घ्यायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आजची लहान मुले, तरुण पिढी ही मोबाईलमध्ये गुरफटली असुन मुलांच्या मोबाईलच्या वापरावर पालकांचे व शिक्षकांचे लक्ष असायला हवे. मुले मोबाईलमधुन काय घेत आहेत, काय नाही याकडे बारकाईने पहायला हवे. 

विज्ञानामुळे जग झपाट्याने पुढे जात असल्याने विद्यार्थ्यांना विज्ञानाची जवळून ओळख व्हावी, यातून नवनवीन प्रयोग सर्वाना समजावे व आजच्या विद्यार्थ्यांमधुन नवीन संशोधक उदयास यावे, हा विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्याचा उद्देश आहे. या विज्ञान प्रदर्शनाचा सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी दिवाने यांनी केले. यावेळी समृद्धी दिवाने यांनी या कार्यक्रमाचे आयोजन व्यंकटेश विद्यालयाच्या सर्व महिला शिक्षकांनी केल्यामुळे सर्वांचे अभिनंदन केले.

यावेळी बोलताना गटशिक्षण अधिकारी शेख म्हणाले की, मागील 2 – 3 वर्ष कोरोना परस्थितीमुळे आपल्याला विज्ञान प्रदर्शन घेता आले नाही. मात्र, यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनामुळे सर्वाना एक प्रकारचा वेगळा उत्साह आहे, त्यामुळे तालुक्यातील अधिकाधिक शाळा व विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतलेला आहे. हे विज्ञान प्रदर्शन घेण्यासाठी व्यंकटेश विद्यालयाने जो पुढाकार घेतला त्याबद्दल शेख यांनी मुख्याध्यापक शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद दिले. 2 दिवसीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदूरकर तर आभार प्रदर्शन मुख्यध्यापक शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन मयुरी मोरे, राधा चिंतावार यांनी केले. या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील जवळपास 60 शाळांनी सहभाग नोंदवला आहे.