बॉक्स ऑफिसवर ‘वेड’ सिनेमाचा धूमाकूळ : रितेश – जिनिलीयाच्या जोडीला चाहत्यांची पसंती

मुुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांच्या जोडीचा ‘वेड’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रितेश आणि जिनिलीयाच्या प्रेमकथेसोबतच ‘वेड’ या चित्रपटात जबरदस्त ॲक्शन देखील पाहायला मिळाली आहे. अनेक वर्षांनी रितेश – जिनिलीया एकत्र मोठ्या पडद्यावर झळकले आहेत. ऑल – टाइम टॉप 5 ओपनिंगनंतर ‘वेड’ या चित्रपटाने सहाव्या दिवशीही तगडी कमाई केली आहे.  

‘वेड’ या मराठी चित्रपटातून जिनिलीया डिसुजा – देशमुख मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे. तर, अभिनेता रितेश देशमुख याने दिग्दर्शक आणि अभिनेता या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आता प्रेक्षक देखील या चित्रपटावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अनेकांनी हा चित्रपट पाहिला असून, सोशल मीडियावर ‘वेड’ हा चित्रपट कसा वाटला ते सांगत आहेत. अनेकांनी हा चित्रपट आपल्या खूप आवडल्याचे म्हटले आहे. 

‘वेलकम बॅक क्वीन’ म्हणत चाहते जिनिलीयाचं कौतुक करत आहेत. मोठ्या ब्रेकनंतर जिनिलीया मोठ्या पडद्यावर परतली आहे. ‘वेड’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुखने केले आहे. या चित्रपटात रितेशसोबत जिनिलीया, अशोक सराफ, शुभंकर तावडे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला आहे. अजय – अतुल या जोडीने या चित्रपटाला संगीत दिले आहे.