बुटातील खडे आणि मनातील तडे काढले तरचं जीवन सुकर हाेते : जगदीश पिंगळे 

मनस्विनी प्रकल्पात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन 

अंबाजोगाई : बुटातील खडे आणि मनातील तडे हे जर काढून टाकले तर शारीरिक जीवन आणि मानसिक जीवन सुखकारक हाेईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे यांनी केले.

अंबाजाेगाई येथील मानवलाेक संचलित मनस्विनी महिला प्रकल्पाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त निर्धार समानता या प्रकल्पाच्या माध्यमातून हिंसामुक्त पंधरवाडा निमित्त ‘समतेचा पाया माझ्या घरात’ या स्पर्धेचे पुरस्कार वितरण साेहळा आयोजित करण्यात आला हाेता. त्यात प्रमुख वक्ते म्हणून जगदीश पिंगळे बाेलत हाेते. व्यासपीठावर मनस्विनी प्रकल्पाच्या प्रमुख डाॅ. अरुंधती पाटील, ‘सा. तिसरी बाजू’ च्या संपादिका सुमती पिंगळे, प्रतिभा देशमुख, सराेजीनी जाजू हे उपस्थित हाेते. 

प्रारंभी क्रांतीज्याेती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला एका चिमुकलीच्या हाताने पुष्पहार घालून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी बाेलताना जगदीश पिंगळे म्हणाले की, समाजात जीवन जगत असताना अनेक संकटांना सामाेरे जावे लागते आणि त्यासाठी माणसाच्या मनात कुठलेही खडे म्हणजे गैरसमज नसायला पाहिजे. शरीरही मजबूत असायला पाहिजे, तरच ताे येणाऱ्या प्रत्येक संकटाला ताेंड देताे आणि समर्थपणे उभा राहताे. त्यासाठी कुटुंबात नवरा आणि बायकाे यांच्यात सामंजस्याचे वातावरण असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

यावेळी श्रीमती प्रतिभा देशमुख आणि सराेजीनी जाजू यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ज्या महिला निवडून आल्या, त्यांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहूल निपटे, सुत्रसंचालन कदम तर आभार प्रदर्शन स्वप्नाली निलंगे यांनी केले.