‘मार्ड’ च्या नंतर आता ‘महावितरण’ चे कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर

अंबाजोगाई : ‘मार्ड’ च्या निवासी डॉक्टरांच्या संपानंतर आता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. आज 3 जानेवारी 2023 रोजी मध्यरात्रीपासून महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी संपावर जाणार आहेत. 

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाला विरोध करण्यासाठी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. हा संप तीन दिवसीय असून राज्यव्यापी असणार आहे. 

महावितरणच्या 30 संघटना खासगीकरण करण्याच्या विरोधात आहेत. त्यामुळे महावितरणने ही संपाची हाक दिली आहे. जर करण्यात आलेली मागणी पूर्ण झाली नाही, तर 3 दिवसांनंतरही हा संप पुढे चालू ठेवण्यात येईल, असेही संघटनांनी म्हंटले आहे. दरम्यान, या काळात वीजपुरवठा खंडित झाला अथवा समस्या निर्माण झाली त्याची जबाबदारी ही वरिष्ठ अधिकारी आणि सरकारची असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे.