अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात विविध कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त असून यात सर्वाधिक रिक्त पदे अधिपरिचारिकांची असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. यामुळे कार्यरत परिचरिकांवर कामाचा असहाय्य ताण पडत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वारातीमध्ये जिल्ह्यातूनच नव्हे तर अन्य जिल्ह्याबाहेरील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. या रुग्णालयाच्या कारभाराबाबत रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये समाधान व्यक्त केले जाते. त्यामुळे या ठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आवाक्याबाहेर असते.
त्यामुळे रिक्त असलेली पदे भरणे क्रमप्राप्त आहे. नियमानुसार तीन रुग्णांमागे एक परिचारिका असायला हवी, परंतु एका परिचारिकेला 50 रुग्णांवर उपचार करावे लागतात. याचा असहाय्य तान कार्यरत असणाऱ्या परिचारिकांवर पडत आहे. कामाच्या असहाय्य ताणातून अधिपरिचरिकाची सुटका करण्यात यावी अशी अपेक्षा आहे.
रिक्त जागा भरण्याबाबत लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
‘स्वाराती’ रुग्णालयात उपचाराबाबत लोकप्रतिनिधी आग्रही भूमिका घेतात. आमचा हा रुग्ण आहे, त्याचे आमुक करा, तमुक करा असे आदेश सोडले जातात. मात्र, या रुग्णालयातील रिक्त जागा भरण्याबाबत कधी आवाज का उठवत नाहीत ? असा संतप्त सवाल कर्मचारी वर्गातून केला जात आहे.