मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जगभरात नागरिकांमधून उत्साह दिसून येत आहे. नववर्ष आगमनाच्या शुभेच्छा संदेशांची देवाणघेवाणही सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलिया खंडात न्यूझीलंड इथं नागरिकांनी नवीन वर्षाचं नयनरम्य रोषणाई तसंच आतिषबाजी करून जल्लोषात स्वागत केलं. अंबाजोगाईतही नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांत उत्साह दिसून येेेत असून विविध वस्त्यांत, प्रभागातही स्वागताची तयारी जोमाने सुरू आहे.
राज्यातल्या देवस्थानांच्या ठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर, कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर, अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे.
शिर्डीत आज पहाटेपासूनच साई भक्तांची मोठी गर्दी दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यासह देशभरातून भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. सगळ्या भक्तांना साईदर्शन घेता यावं यासाठी आज रात्रभर साई मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थाननं घेतला आहे.