नवी दिल्ली : कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय आज सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. दुपारी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ही बैठक होईल. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उच्चस्तरीय बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या होत्या.
दरम्यान, भारतीय विमानतळांवर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानातल्या किमान दोन टक्के प्रवाशांची कोविड चाचणी करण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं घेतला आहे. विविध देशांत सध्या फैलावत असलेल्या कोरोनाच्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रसाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत आहे.
कोविड – 19 च्या XBB प्रकाराबाबत समाज माध्यमावर फिरत असलेला संदेश बनावट आणि दिशाभूल करणारा आहे, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांनी या खोट्या संदेशांकडे लक्ष देऊ नये, असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे.