सम्मेद शिखरजी पर्यटन क्षेत्र घोषित केल्याविरोधात जैन धर्मीयांचा ‘मुकमोर्चा’

अंबाजोगाई : जैन धर्मियांचे अतिशय पवित्र असे सिद्धक्षेत्र महापर्वतराज सम्मेद शिखरजी हे पर्यटन क्षेत्र घोषित केल्याचा झारखंड सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी जैन धर्मीयांच्या वतीने ‘मुकमोर्चा’ काढण्यात आला. अंबाजोगाई तालुक्यातील सकल जैन समाजाचे सर्व व्यवहार आज दि. 21 डिसेंबरला बुधवारी बंद ठेवण्यात आले होते. 

जैन धर्मियांचे 24 तिर्थंकरापैकी 20 तिर्थंकर ज्या भूमीत मोक्षाला गेले अशा झारखंड राज्यातील मधुवन (जिल्हा – गिरडीह) येथील महापर्वतराज सम्मेद शिखरजी क्षेत्र झारखंड सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या अनुषंगाने त्या ठिकाणी मांसाहारी हॉटेल्स, पब – बार व इतर अशा बऱ्याच मनोरंजक गोष्टी सुरू होतील की ज्या अहिंसा तत्त्वाच्या एकदम विरूद्ध असणार आहेत. जागतिक पातळीवर जैन समाज हा अत्यंत शांतताप्रिय व अहिंसा तत्वाचा पुजारी आहे. जैन समाजातील प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी सम्मेद शिखरजी येथे जाऊन 20 तिर्थंकर पवित्र मोक्ष भूमीवर पहाड वंदना अनवाणी करण्याची इच्छा बाळगतो.

परंतु, सरकारच्या सदर निर्णयामुळे जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात आले असून जैन समाजाच्या अस्मितेवर घाला घालायचा हा प्रयत्न आहे. या निर्णयामुळे देशभरातील सकल जैन समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून देशभरात सर्व स्थरातून या निर्णयाचा निषेध केला जात आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील सकल जैन समाज सरकारच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त करत आहे. भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान व झारखंड राज्याचे मुख्यमंत्री यांना सकल जैन समाजच्या वतीने सदर निर्णय बदलून भावनांचा आदर करावा ह्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन समाजाच्या तीव्र भावना आपण शासनास कळविण्यात यावे, ही विनंती करण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या मुकमोर्चामध्ये श्री 1008 विमलनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र, अंबाजोगाई, जैन श्रावक संघ, अंबाजोगाई, सकल जैन समाज, अंबाजोगाई तालुका यांची उपस्थिती होती.