अंबाजोगाई : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच असून अंबाजोगाई – लातूर रस्त्यावर आज सांयकाळी दोन अपघात झाले आहेत. हे दोन्ही अपघात इतके भीषण होते की यात 3 जणांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. एक अपघात बर्दापुर जवळ तर दुसरा सायगाव जवळ झाला आहे. एकाच रस्त्यावर दोन अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई – लातूर राष्ट्रीय महामार्गावर बर्दापुर फाट्याजवळ मुरुड फाटा आहे. या फाट्यावर उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला कारने जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील 3 जणांचा जागीच मृत्यु झाला. अपघाताची माहिती मिळताच बर्दापुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरु केले आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे बबन प्रभू राठोड (वय 45, रा. बिटरगाव, ता. रेणापूर), नंदू माणिक राठोड (वय 33, रा. बिटरगाव, ता. रेणापूर), राहुल सुधाकर मुंडे (वय 31, रा. वंजारवाडी, ता. रेणापूर) असे आहेत.
दुसरा अपघात अंबाजोगाई – लातूर महामार्गावरच सायंकाळी सायगाव जवळ ट्रक – टेम्पो आणि कार असा तिहेरी अपघात झाला. या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले आहेत, यात एका महिलेचा समावेश आहे. अपघातातील जखमींना अधिक उपचारासाठी ‘स्वाराती’ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान राष्ट्रीय महामार्गामुळे रस्ते अधिक चांगले झाले असले तरी वाहनांचा वेग मर्यादित ठेवणे गरजेचा आहे. अंबाजोगाई – लातूर महामार्गावर अपघाताच्या घटना वाढतच असून हे अपघात रोखण्यासाठी तातडीने योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे.