हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली.

विधानसभा सदस्य अहिरे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आल्या. त्या आपल्या अडीच महिन्याच्या प्रशंसक या बाळासमवेत आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांना मिळताच त्यांनी आमदार आहेर यांची भेट घेऊन त्यांची आणि बाळाची विचारपूस केली.

विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून कायदे बनवणे आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणे म्हणजे स्त्रीमधील कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याच्या विधिमंडळात पहिल्यांदाच अशी घटना घडत असल्याने त्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर कौतुक केले. यावेळी आमदार सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ आणि सासुबाई कल्पना वाघ हे देखील उपस्थित होते.