ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 33 लालपरींचे ‘बुकिंग’ : प्रशासनाकडून तयारी पूर्ण

अंबाजोगाई :  तालुक्यातील 81 ग्रामपंचायतींसाठी येत्या रविवारी (दि.18) सार्वत्रीक निवडणूका होत आहेत. या निवडणूकीसाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी व साहित्य लागते. निवडणूक कर्मचारी व निवडणुकीचे साहित्य ने – आण करण्यासाठी निवडणूक विभागाला राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या लालपरीची गरज पडतेच. त्यानुसार या निवडणुकीसाठी 33 लालपरींचे ‘बुकिंग’ केले आहे.  

तालुक्यात ऑक्टोबर ते डिसेंबर – 2022 या कालावधीत कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जात असून, यामध्ये तालुक्यातील 81 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सध्या ग्रामपंचायत निवडणूक प्रचार शिगेला पोहचला असून, येत्या रविवारी (दि.18) मतदान प्रक्रिया घेतली जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडूनही तयारी पुर्ण झाली असून, मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्यासह ने – आण करावी लागते. यासाठी 33  लालपरींची ‘बुकिंग’ येथील निवडणूक विभागाने केल्याची माहिती आगारप्रमुख नवनाथ चौरे यांनी दिली आहे.