सखी मतदान केंद्राचे होतयं कौतुक : शांततेत पार पडले मतदान
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील 81 ग्रामपंचायतींसाठी आज रविवारी (दि.18) मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणूकीसाठी दुपारपर्यंत 66 टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान मतदान केंद्रावर काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी प्रत्येक मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता. अत्यंत शांततेत तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले.
अंबाजोगाई तालुक्यातील 81 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून अंबाजोगाई तालुका प्रशासनाने निवडणूकीची जय्यत तयारी केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते मतदानापर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन केले आहे.
तालुक्यातील जोगाईवाडी /चतुरवाडी ग्रा. पं. निवडणुकीच्या मतदानासाठी तहसीलच्या निवडणूक विभागाने व्यंकटेश विद्यालयात,(पोखरी रोड) सखी मतदान केंद्र कार्यरत केले होते. या केंद्रावर सर्व महिला कर्मचारी नियुक्त केलेल्या होत्या. हे केंद्र सजावट करून सुशोभित करण्यात आले होते. सकाळी मतदानास प्रारंभ होताच, या केंद्रावर मतदारांचे स्वागत करून मतदान प्रक्रियेस सुरूवात झाली. या उपक्रमाचे सर्व स्तरांतन कौतुक करण्यात आले.
अंबाजोगाई तालुक्यातील 81 ग्रामपंचायतीसाठी दुपारपर्यंत 66 टक्के मतदान झाले असले तरी अजूनही मतमोजणी बाकी आहे. त्यामुळे भावी सरपंचांचे, सदस्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. मंगळवारी मतमोजणी असल्याने त्या दिवशी बहुतांश ग्रामपंचायतीचे चित्र स्पष्ट होईल. सगळ्या उमेदवारांच्या, कार्यकर्त्यांच्या नजरा आता मतमोजणीकडे लागल्या आहेत.