‘सूर लागू दे’ चित्रपटाचा लक्षवेधी टिझर प्रदर्शित

मुंबई : विक्रम गोखले यांच्या पश्चात प्रदर्शित होणाऱ्या ‘सूर लागू दे’ या चित्रपटाचा टिझर  प्रदर्शित करण्यात आला आहे. निर्माते अभिषेक ‘किंग’ कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी ऑडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

पिकल एंटरटेन्मेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या वितरणाच्या माध्यमातून हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण विजया एकनाथ बिरजे यांचे आहे.

विक्रम गोखले आणि अभिनेत्री सुहासिनी मुळये या दोन दिग्गजांची जुगलबंदी यात आहे. रीना मधुकरनं साकारलेल्या कॅरेक्टरचीही झलक टिझरमध्ये आहे. ‘कलियों का चमन…’ फेम मेघना नायडू या चित्रपटात एका सरप्राईज पॅकेजच्या रूपात आहे.  

या चित्रपटाचं लेखन आशिष देव यांचे असून, संगीत पंकज पडघन यांचे आहे. टिझर लॉन्च सोहळ्यात व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना सुहासिनी मुळ्ये म्हणाल्या की, ‘सूर लागू दे’ हि नातेसंबंधांची गोड कथा आहे. या सिनेमाचं शेवटचं शेड्यूल सुरु होण्यापूर्वी विक्रमजींनी मला फोन केला. ते म्हणाले की, मला माझं कुठलंही काम अर्धवट सोडायचं नाही. त्या नाजूक परिस्थितीतही त्यांनी 14 – 14 तास काम करुन ‘सूर लागू दे’ चं शूटिंग पूर्ण केलं.