मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाले नियुक्ती पत्र
अंबाजोगाई : अभ्यासात सातत्य, चिकाटी, मेहनत आणि प्रचंड आत्मविश्वासच्या बळावर अंबाजोगाई तालुक्यातील नांदगावच्या राहुल रामराव पवार याने मोठे यश संपादन केले आहे. ‘एमपीएससी’ मार्फत त्याची सहाय्यक अभियंतापदी निवड झाली आहे. नियुक्तीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच मिळाले. राहुलने मिळवलेल्या गगनचुंबी यशाचे त्याच्या गावासह तालुक्यातून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2019 मध्ये अभियांत्रीकी (स्थापत्य) सेवा या पदासाठी परिक्षा घेण्यात आली होती. यामधील पात्र उमेदवारांना नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आले. यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव येथील रहिवासी राहूल रामराव पवार याची सहाय्यक अभियंता म्हणून सार्वजनिक बांधकाम उपविभाग, अंधेरी मुंबई येथे नियुक्ती झाली आहे.
राहूल पवार हे सार्वजानिक बांधकाम विभाग बीड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद येथे कार्यकारी अभियंता म्हणून कामकाज केलेले सेवानिृत्त आर. आर. पवार यांचे चिरंजीव आहेत. घरात पूर्वीपासून शैक्षणीक वातावरण असल्याने राहुललाही अभ्यासात गोडी निर्माण झाली होती. अभ्यासात त्याने सातत्य कायम ठेवले होते. राहूल पवार याची सा. बां उपविभाग, अंधेरी मुंबई येथे सहाय्यक अभियंता म्हणून झालेल्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.