मनोज गडबडे यांच्यासह दोघांची बिनशर्त सुटका करा : चंद्रकांत पाटलांवर सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली कठोर कार्यवाही करा

आंबेडकरी समुदायाची निदर्शने : उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

अंबाजोगाई : समता सैनिक दलाचे मनोज गडबडे यांच्यासह दोघांची बिनशर्त सुटका करून सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली मंत्री चंद्रकांत पाटलांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी आंबेडकरी समुदायाने केली आहे. या संदर्भात आज दिनांक 12 डिसेंबरला उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करित निवेदनही देण्यात आले. 

उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हणटले आहे की, महाराष्ट्रातील संघ – भाजपचे नेते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुलेे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल सतत अवमानकारक बोलत आहेत. हे  सर्व समाजसुधारकांना शत्रु मानतात, हे लपून राहिलेले नाही. राज्यपाल तर अत्यंत हिनकस असे बोलून गेले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लोढा नावाचे मंत्री इतिहास बदलून बोलले.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. आंबेडकर व कर्मवीरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. याची प्रतिक्रिया म्हणून पुण्यात आंदोलने झाली तर खोटे गुन्हे दाखल झाले. हा असाच प्रकार चालू राहिला तर जनता आणखी जोरदार प्रतिकार करेल. तरुण कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे वापस घ्या, गुन्हे वापस घेतली नाही तर परत तीव्र असे आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी, असा इशारा आंबेडकरी समुदायाने दिला आहे.

या निवेदनावर कॉ. बब्रुवाहन पोटभरे, राजेश वाहुळे, दयानंद कांबळे, धिमंत राष्ट्रपाल, अमोल हतागळे, अक्षय शिंदे, अक्षय भुंबे, राजाराम कुसळे, अशोक सोनवणे, भागवत जाधव यांच्यासह आदींच्या सहृया आहेत. यावेळी आंबेडकरी समुदायातील महिला – पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.