महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचा कारनामा : अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कायमस्वरूपी प्राचार्यांना डावलून बडतर्फ प्राध्यापकाची केली कार्यकारी प्राचार्यपदी नियमबाह्य नियुक्ती..?

पत्रकार परिषदेत संस्थासचिव आणि संचालक यांची माहिती

अंबाजोगाई : महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचालित अंबाजोगाई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सन 1993 पासून कायमस्वरूपी सेवारत असलेल्या प्राचार्यांना डावलून संस्थेच्या कथित पदाधिकाऱ्यांनी मनमानी कारभाराचा आपला वारसा पुढे चालू ठेवत विद्यापीठाची दिशाभूल करून एका बडतर्फ प्राध्यापकाची महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्यपदी नियमबाह्य नियुक्ती केली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत संस्थासचिव, संस्था संचालक यांनी दिली आहे. या पदाधिकाऱ्यांच्या तसेच विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ आज सोमवारी महाविद्यालय बंद ठेवून आंदोलन ही करण्यात आले हे विशेष. महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या कथित पदाधिकाऱ्यांचे सतत सुरू असलेले कारनामे ऐकून व पाहून शैक्षणिक वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे.

अंबाजोगाईत सोमवार, दिनांक 12 डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत संस्थासचिव माधवराव पाटील टाकळीकर व संस्था संचालक प्रदीप दिंडीगावे यांनी दिलेली माहिती अशी की, महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेत मागच्या तीन दशकांहून अधिक काळापासून सुरू असलेला अंतर्गत वाद मिटविण्याकामी मागच्या काही महिन्यांत तत्कालीन संस्थासचिव माधवराव पाटील टाकळीकर यांनी यशस्वी प्रयत्न केले होते. वाद मिटवून त्यांनी संस्थेत एक प्रकारची शिस्त आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यात त्यांना यश ही मिळत होते. असे असतानाच पुन्हा एकदा ही संस्था आपली व्यक्तिगत मालमत्ता आहे, असे समजून चालणाऱ्या काही जुन्या कथित पदाधिकाऱ्यांनी नको त्या मार्गांचा अवलंब करून चुकीच्या पध्दतीने संस्था ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

या प्रकरणी अजून ही न्यायालयीन लढा चालूच आहे. असे असताना देखिल या कथित पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या जवळपास सर्वच युनिट मध्ये सतत हस्तक्षेप करून त्या ठिकाणची शिस्त बिघडविण्याचा जणू काही सपाटाच लावला आहे. लातूरच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात ही त्यांनी अशाच प्रकारे हस्तक्षेप करून तेथील सुधारत असलेले शैक्षणिक वातावरण पुन्हा पूर्ववत बिघडविण्याचे काम केले आहे, ही बाब सर्वज्ञात आहे. हे कमी होते म्हणून की काय, आता या कथित पदाधिकाऱ्यांनी आपला मोर्चा संस्थेच्या वतीने अंबाजोगाई येथे चालविण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे वळविला आहे. त्या ठिकाणी प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी हे सन 1993 पासून कायमस्वरूपी प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. प्राचार्य डॉ. खडकभावी यांच्या नेतृत्वात या अभियांत्रिकी  महाविद्यालयाने केवळ मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपला नांवलौकिक निर्माण केलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली आहे. 

मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातील एक दर्जेदार अभियांत्रिकी महाविद्यालय अशी या महाविद्यालयाची प्रतिमा निर्माण करण्याचे काम यापूर्वी सातत्याने आदर्श प्राचार्य डॉ. खडकभावी यांनी केले आहे. असे असताना ही संस्थेच्या या कथित पदाधिकाऱ्यांनी अचानकपणे प्राचार्य खडकभावी यांना  कोणती ही पूर्वसूचना न देता त्यांच्या जागी कार्यकारी प्राचार्य म्हणून या महाविद्यालयात आजमितीस कार्यरत नसलेले व यापूर्वीच बडतर्फ करण्यात आलेले प्रा.डॉ.एम.जी.पोद्दार यांची नियुक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल विद्यापीठ, लोणेरे यांची दिशाभूल करून घेतली आहे.

विशेष म्हणजे ज्या प्राध्यापकाची कार्यकारी प्राचार्य म्हणून नियुक्ती केली गेली आहे, ते मागच्या साडेतीन वर्षांपासून महाविद्यालयात कार्यरतच नाहीत. त्यांना संस्थेने पूर्वीच सेवेतून बडतर्फ केलेले आहे. शिक्षण क्षेत्रात ही चुकीची कृती करताना संस्थेच्या या कथित आणि वादातीत पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठातील काही मंडळींना हाताशी धरून ज्यांचे नांवच एआयसीटी व विद्यापीठाच्या यादी मध्ये नाही, अशा व्यक्तीची नियमबाह्यपणे कार्यकारी प्राचार्य पदावर नियुक्ती करून घेण्याचे काम केले आहे. हा प्रकार शासनाच्या सन 2012 च्या परिपत्रकाचा व उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारा आहे. ही कृती करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची दिशाभूल करून काहीही करता येवू शकते असाच संदेश जणू सामान्य नागरिकांना देण्याचे काम केले आहे. 

अंबाजोगाई सारख्या विद्येचे माहेरघर असणाऱ्या शहरात विद्यापीठ आणि महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या चुकीच्या कार्य पध्दतीचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. विद्यापीठाने चुकीच्या व निमबाह्यपणे केलेली ही नियुक्ती तात्काळ मागे घेऊन संबंधितांनी बनावट कागदपत्रे दाखल करून विद्यापीठ प्रशासनाची फसवणूक केल्याच्या आरोपांवरून त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात बेमुदत काळासाठी ‘महाविद्यालय बंद आंदोलन’ करण्यात येईल असा इशारा शिक्षणप्रेमींनी दिला आहे. त्याच बरोबर या कृतीच्या निषेधार्थ औरंगाबाद येथील विद्यापीठ उपकेंद्रासमोर उपोषणास बसण्याचा इशारा ही देण्यात आला आहे. 

तसेच शिक्षण क्षेत्रात चालू असलेली ही बेबंदशाही रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून संसदेत ही या प्रश्नावर आवाज उठविण्याचा इशाराही देण्यात आला आहे. अशी माहिती पत्ररका परिषदेतून देण्यात आली आहे. यावेेेळी प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी, प्राध्यापक व कर्मचारी प्रतिनिधी डॉ. विवेकानंद राजमान्य हे उपस्थित होते. पत्रकार परिषदेचे सुत्रसंंचालन करून प्रा. एस. ए.बिराजदार यांनी आभार मानले.