अनैतिक प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नी – मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींची होणार लाय – डिटेक्टर चाचणी

फिर्यादी मयत मुलीचे वडील उमाकांत भारजकर व पोलीस प्रशासनाच्या मागणीला यश

आरोपीस फाशीच्या शिक्षेची भारजकर कुटुंबियांची मागणी

अंबाजोगाई : स्वतः विवाहित व एक मुलाचा पिता असतानासुद्धा दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक प्रेमाच्या आड येणाऱ्या पत्नी व पोटच्या मुलाच्या मृत्यस कारणीभूत ठरलेल्या आरोपी पती व त्याच्या प्रेयसीची लाय – डिटेक्टर चाचणी करण्याची अंबाजोगाई येथील प्रगतीशील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते उमाकांत भारजकर  तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली मागणी न्यायालयाने मंजूर केली आहे. या नंतर भारजकर कुटुंबियाने आरोपी जावयाची फाशीच्या शिक्षेची मागणी पत्रकार परिषदे द्वारे केली आहे. या पत्रकार परिषदेत सुप्रियाचे वडील उमाकांत भारजकर, आई शालिनी भारजकर व मुलगा ओंकार भारजकर हे उपस्थित होते.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, अंबाजोगाई शहरातील सामाजिक कार्यकर्ते उमाकांत भारजकर यांची सुकन्या सुप्रिया हिचा विवाह 28/04/2015 रोजी तांदुळजा येथील उल्हास विष्णू डोलारे याच्याशी रितसरपणे झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी पती – पत्नी यांच्यात सतत भांडणे होऊ लागले. तसेच सासरची मंडळी देखील तिला वारंवार त्रास देत होती, असे सुप्रियाने एका वहीत आपल्या हस्ताक्षराने लिहून ठेवले होते. सुप्रिया व उल्हास याना 4/2/2016 रोजी मुलगा झाला. काही दिवसांनी म्हणजेच 26/10/2021 रोजी सुप्रिया आजारी पडल्याने तिला तिच्या पतीने अंबाजोगाई येथील घुगे हॉस्पिटल येथे दाखल केले. तेथे उपचार होत नसल्याने सुप्रिया हिला पुढील उपचारासाठी लातूर व सोलापूर येथे दाखल करावे लागले . मात्र, उपचारादरम्यान 4/11/2021 रोजी सुप्रियाचा मृत्यू झाला.

मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुरुड , (ता. जि. लातूर) पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली. फिर्यादी नुसार गु. र. न. 34/2022 कलम 498अ, 504, 34भादवि अन्वये दिनांक 21/02/2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलीच्या मृत्यूनंतर तिचा मुलगा शिवम (वय 7) यास अंबाजोगाई येथे राहण्यासाठी आणले होते. दोन महिन्यानंतर जावई उल्हास याने आपल्या मुलास (शिवम) यास आपणाकडे घेऊन जाणार असल्याचे सांगून तो त्यास आपल्यासोबत घेऊन गेला. दरम्यानच्या काळात जावई उल्हास डोलारे माझ्या व कुटुंबियांच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी धमकाऊ लागला. तेव्हा आम्ही शिवमच्या भविष्यासाठीची तरतूद करा, आम्ही तक्रार परत घेतो असे सांगितले. असे असतानाच दि. 25/08/2022 रोजी शिवम हा त्यांच्याच शेतातील विहिरीत पडून मरण पावल्याची खबर मिळाली. खबर मिळताच ताबडतोब उमाकांत भारजकर आपल्या नातेवाईकांसह तांदुळजा येथे गेले असतांना शिवमचा मृतदेह उल्हास डोलारे यांच्याच नवीन विहिरीत तरंगत असलेला आढळून आला. तेथील पोलीस व गावकऱ्यांच्या मदतीने शिवमचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला व नंतर मुरुड येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविला. या दरम्यान उल्हास किंवा त्याचे कुठलेही नातेवाईक घटनास्थळी आले नाहीत. 

शवविच्छेदनानंतर शिवमचा मृतदेह अंबाजोगाई येथे आणून त्यावर भारजकर कुटुंबियांकडून अंतिम संस्कार करण्यात आले. त्याच दिवशी (दि.25) रोजी जावई उल्हास डोलारे, आई लक्ष्मीबाई व वडील विष्णू डोलारे यांनी आपसात संगनमत करुन शिवम यास विहिरीत ढकलून त्यांचा खून केल्याची फिर्याद  पोलिसात दाखल केली. शिवमच्या मुत्युस कारणीभूत ठरलेल्या उल्हास डोलारे व त्याची प्रेयसी सुवर्णा ढेम्बरे यांची लाय – डिटेक्टर चाचणी करण्याची मागणी पोलीस निरीक्षक मुरुड व उमाकांत भारजकर यांनी केली होती. न्यायालयाने आरोपींची लाय – डिटेक्टर चाचणी करण्याची मागणी मान्य केली असल्याने आम्ही भारजकर कुटुंबीय मयत सुप्रिया आणि शिवम यास न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.