पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणार : डॉ. राहुल मुंडे
अंबाजोगाई : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांची ‘मार्ड’ ही राज्यव्यापी संघटना आहे. येथील ‘स्वाराती’ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘मार्ड’ च्या अध्यक्षपदी डॉ. राहुल मुंडे यांची बहुमताने निवड झाली आहे तर सचिवपदी डॉ. अजित अरबट, उपाध्यक्षपदी डॉ. प्रवीण शेरखाने, डॉ. अनुश्री कैन, महिला प्रतिनिधी म्हणून डॉ. जवेरीया शेख, वसतिगृह प्रतिनिधी म्हणून डॉ. संतोष कसारे, डॉ. शारण पिंटो यांची निवड झाली आहे.
मावळते अध्यक्ष डॉ. धीरज चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद केंद्रेकर, सचिव डॉ. चिन्मय इंगळे, डॉ. रितेश बोरसे, डॉ. रोशनी मालपानी व महिला प्रतिनिधी डॉ. पूजा पाटील यांनी नवीन कार्यकारिणीकडे कार्यभार हस्तांतरित केला. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी जुन्या कार्यकारिणीच्या सदस्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.
नवीन सदस्यांना उत्साहाने काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. येत्या काळात पदव्युत्तर विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. राहुल मुंडे व सहकाऱ्यांनी सांगितले. तसेच लोकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी अधिष्ठाता यांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. रुग्णालयातील अतिशय संवेदनशील असलेल्या अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, नवजात अतिदक्षता विभाग, प्रसूती कक्ष येथे रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर दबाव न आणता सन्मानाची वागणूक मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.
येणाऱ्या काळात पदव्युत्तर विद्यार्थी चळवळ अधिक बळकट करून डॉक्टरांच्या अडचणी सोडवण्या बरोबरच रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याची ग्वाही ‘मार्ड’ च्या वतीने डॉ. राहुल मुंडे यांनी दिली.