अभिनंदनीय : अंबाजोगाईच्या ज्येष्ठांच्या महिला संघास राष्ट्रीय पुरस्कार, 16 नोव्हेंबरला वितरण

अंबाजोगाई : येथील योगेश्वरी महिला जेष्ठ नागरिक  संघास अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या  वतीने उत्कृष्ट कार्यासाठी देशातील सर्वोत्तम ज्येष्ठ नागरिक संघ 2018 – 19 साठीचा पुरस्कार मिळाला आहे. कोरोना काळामुळे दरवर्षी होणारे जेष्ठांचे राष्ट्रीय अधिवेशन गत तीन वर्ष झाले नाही.

पारितोषिकाचे वितरण अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक संघटनाच्या मैसूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. 

योगेश्वरी महिला जेष्ठ नागरिक संघ, अंबाजोगाई हा गेल्या पंचवीस वर्षापासून अंबाजोगाई येथे कार्यरत असून या संघात 150 पेक्षा जास्त महिला सदस्य आहेत. जेष्ठांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक व महिला सबलीकरणाच्या संबंधित विविध कार्यक्रम या संघटनेच्या माध्यमातून सातत्याने राबवले जातात. तसेच जेष्ठा संबंधीच्या कौटुंबिक तंटा निवारणाचे कार्यही या संघटनाच्या माध्यमातून केले जाते.

संघटनेच्या सातत्यपुर्ण व वैशिष्ठ्यपुर्ण कार्याची दखल घेऊन देशातील सर्वोत्कृष्ठ जेष्ठ नागरिक संघ म्हणून योगेश्वरी महिला जेष्ठ नागरिक संघ, अंबाजोगाई यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. अध्यक्षा श्रीमती कमल गोविंदराव बरुळे, सचिव श्रीमती मंगला अरुण भुसा व संघाच्या सर्व सदस्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.