अंबाजोगाई : शहरातील भोगवटाधारकांची मालकी हक्कात नोंद करावी आणि रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी निवारा हक्क समितीने आज दिनांक 7 नोव्हेंबरला पुन्हा एकदा अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, घरकुल योजनांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी निवारा हक्क समितीने हे पाचवे आंदोलन केले आहे. या मोर्चात असंख्य बेघर सहभागी झाले होते.
या संदर्भात अपर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबाजोगाई शहरात शेकडो वर्षांपासून रहिवास असलेल्या विविध झोपडपट्या आहेत. ज्यात विविध जातीधर्माचे लोक राहतात. नगरपरिषद, अंबाजोगाई यांना सर्व मूलभूत सुविधा देऊन त्यांच्याकडून करवसुली करते. परंतू, नगरपरिषदेने यांची घरे मालकी हक्कात लावली नाहीत. सन 2022 अखेर पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी करण्याचे सरकारचे धोरण असताना अंबाजोगाई शहरात किमान 10 हजार घरे भोगवट्यात आहेत. ती मालकी हक्कात नसल्याने या योजनेचा लाभ शहरातील गोरगरिबांना झाला नाही.
नगरपरिषदेने मोजनी कार्यालयाचे आदेश न पाळल्याने गोरगरिब जनता सरकारी लाभापासून वंचित राहिली आहे. आपण जिल्हाधिकारी यांना रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेचे प्रस्ताव देण्याची शिफारस करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी कॉ. बब्रुवाहन पोटभरे, युवानेता विनोद शिंदे, प्रशांत मस्के यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केले. या निवेदनावर कॉ. बब्रुवाहन पोटभरे, विनोद शिंदे, प्रशांत मस्के, शेख अनिस, राजाराम कुसळे, उषाबाई आदमाने यांच्यासह आदींच्या सह्या आहेत.