अंबाजोगाई – लातूर महामार्गावर अपघात : युवकाचा जागीच मृत्यू

अंबाजोगाई : अंबाजोगाई – लातूर महामार्गावर अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगातील खासगी बसने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी रात्री 10:30 च्या सुमारास पोखरी ते सायगाव दरम्यान झाला. 

या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई शहरातील कपड्याच्या दुकानातील काम संपवून करण श्रीमंत शिंदे (वय 19, रा. सुगाव), व्यंकटी पवार (वय 26, रा. सुगाव), नामदेव मोतीराम चव्हाण (वय 25, रा. नांदगाव) हे तिघे शनिवारी रात्री दुचाकीवरून गावाकडे निघाले होते. रात्री 10:30 च्या सुमारास ते पोखरी ते सायगाव दरम्यान महामार्गावर असताना भरधाव वेगातील खासगी बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

या अपघातात करण शिंदे याचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर ‘स्वाराती’ रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान या घटनेमुळे सुगाव गावावर शोककळा पसरली आहे.