स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत स्वतंत्र लढायचं, कामाला लागा : अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन

शिर्डी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचा निर्णय येत नाही तोपर्यंत स्वतंत्र लढायचं आहे, असं समजून कामाला लागण्याचं आवाहन, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंथन शिबीरात काल मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेले कार्यकर्तेच पक्षाला ताकद देतात, त्यातून आमदार, खासदार तयार होतात, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका केली. राज्यातल्या सर्व निवडणुका वेळेत होण्याकडे राज्य निवडणूक आयोगानं लक्ष देण्याची गरजही पवार यांनी व्यक्त केली. 

सध्या निवडणुकांना विलंब लावला जात असून लोकशाहीच्या दृष्टीने हे योग्य नाही, असं ते म्हणाले. फेब्रुवारी 2023 मध्ये पाच निवडणुका होणार असून, आघाडी करुन या निवडणुका लढवल्या जाणार आहेत. या पाचही जागा आघाडीच्याच निवडून येतील, यावर लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं.

दरम्यान, काल प्रारंभी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन या शिबिराचं उद्घाटन झालं. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या शिबिरात सहभागी झाले होते.