राज्यातल्या बळीराजाला ‘सुजलाम सुफलाम’ करण्यासाठी आम्हाला शक्ती दे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर : राज्यातल्या बळीराजाला ‘सुजलाम सुफलाम’ करण्यासाठी आम्हाला शक्ती दे, शेतकऱ्यांवरचं संकट दूर होऊ दे, असं साकडं विठूरायाला घातल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. कार्तिकी एकादशीनिमित्त आज पहाटे पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुख्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर ते बोलत होते.

पंढरीच्या वारीची कुठलीही परंपरा खंडित न करता पंढरपुरच्या विकास आराखड्याचं काम हातात घेतलं जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर मंदिर संवर्धनाचं काम तत्काळ हातात घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

दरम्यान, भागवत धर्म प्रसारक समिती, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव समाजोन्नती परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित पंढरपूर ते घुमान सायकल आणि रथ यात्रेचा शुभारंभ आज फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

संत नामदेव महाराजांनी चालत जावून भारतभर भागवत धर्माचा प्रसार केला. त्यांचा बंधुत्वाचा संदेश आणि भागवत धर्माचा विचार या यात्रेतून घुमानपर्यंत पोहोचणार आहे. यनिमित्ताने पंढरपूर – घुमान यांचं पुन्हा एकदा नातं तयार होणार असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.