धक्कादायक : मुकुंदराज परिसरातील व्ह्यू पॉईंटवरून उडी मारुन युवकाची आत्महत्या

अंबाजोगाई : शहरात आज सकाळी धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील मुकुंदराज परिसरात वनविभागाने तयार केलेल्या व्ह्यू पॉईंटवरून खोल दरीत उडी मारून 20 वर्षीय युवकाने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज सोमवारी (दि.31) सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास घडली. दिनेश नरेश लोमटे (रा. कोष्टी गल्ली, अंबाजोगाई) असे त्या मयत युवकाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे.

या बाबत प्राप्त माहिती अशी की, मुकुंदराज परिसरात आज पहाटेच दिनेश आत्महत्या करण्यासाठी धावत सुटला होता. पाठीमागे त्याची आई त्याला रोखण्यासाठी आरडाओरडा करत धावत होती. हे पाहून सकाळी मॉर्निंग वॉकसाठी त्या परिसरात असणारे पत्रकार दत्ता अंबेकर, बालाजी खैरमोडे, अशोक दळवे, मारुती जोगदंड यांनी दिनेशला रोखून त्याची समजूत काढली. तो शांत झाल्याचे पाहून त्याला त्याच्या आईजवळ सोडून सर्व निघून गेले. मात्र, थोड्याच वेळात दिनेशने बुट्टेनाथ रोडवरील वनविभागाच्या व्ह्यू पॉईंटवरून खोल दरीत उडी मारली. 

आईचा आरडाओरडा ऐकून पुन्हा पत्रकारांनी तिकडे धाव घेतली. अशोक दळवे यांनी दरीत उतरून पाहिले असता दिनेश मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले. याची खबर शहर पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी रवाना झाले असून घटनेचा अधिक तपास करीत आहेत.