प्रायव्हेट प्रॅक्टिस केली तर थेट डिसमिस : आयुक्त तुकाराम मुंढेंची शासकीय डॉक्टरांना वॉर्निंग

बीड : डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार हाती घेतल्यानंतर मराठवाडा दौऱ्याला सुरूवात केली आहे. आज तुकाराम मुंढे हे बीडमध्ये आले होते. त्यांनी जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. 

आता प्रायव्हेट प्रॅक्टिस केली तर थेट डिसमिस करणार, असं म्हणत मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी ही लास्ट वार्निंग आहे, असं म्हणत मुंढे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिला. मुंढे यांच्या या इशाऱ्याने जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची चांगलीच झोप उडाली आहे.

मुंढे यांनी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत अहवाल पाठवण्याचे आदेश उपसंचालक, लातूर यांना दिले आहेत. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गित्ते, यांना सुधारणा करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. तसेच उपचारामध्ये हलगर्जीपणा आणि रुग्णांची हेळसांड सहन केली जाणार नाही, असा सज्जड दम तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

बीड जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, प्रसूती वार्ड आणि फिव्हर क्लिनिकला मुंडे यांनी भेट दिली. यावेळी डॉक्टर उपलब्ध नव्हते तर खाजगी डायग्नोसिस सेंटरमधून रिपोर्ट, त्यावर उपचार सुरू होते. या संदर्भात विचारणा केली तसेच नवोदित बाळाला पोलिओ डोस दिल्याचं, बेबी कार्ड तयार नव्हते, यावरून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना खडे बोल त्यांनी सुनावले. 

दरम्यान, मुंढे यांनी बेजबाबदार अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली आहे. त्याचबरोबर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी खाजगी प्रॅक्टिस करू नये, जर केल्यास डीसमिस करू, असा सज्जड दम देखील यावेळी मुंडे यांनी भरला आहे.