मुंबई : राज्यातील अतिवृष्टीबाधित झालेल्या शेतीच्या पंचनाम्यासाठी असलेली ई – पीक पाहणीची अट राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्पुरती रद्द केली आहे. विखे पाटील यांनी तीन दिवस अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.
तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे रखडले असल्याचं निदर्शनास आणून देत, शेतकऱ्यांनी ई – पीक पाहणीची अट रद्द करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार विखे पाटील यांनी यावर्षी ई – पीक पाहणीची अट तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
परिणामी स्थानिक पातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करावे लागणार आहेत. या प्रक्रियेत कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.