अंबाजोगाई शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करा, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा : शिवसेना

अंबाजोगाई : शहराला पाणीपुरवठा करणारा धनेगाव प्रकल्प तसेच काळवटी तलाव जवळपास भरला आहे. मात्र, शहरात आठ ते दहा दिवसाला पाणी पुरवठा होत आहे. अंबाजोगाई शहरात चार दिवसाआड पाणी पुरवठा करावा. शहरात वाढलेल्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी  शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबाजोगाई शहरातील सर्वच भागात विशेषतः जुन्या शहरातील गल्ली – बोळामध्ये घाणीचे साम्राज्य वाढले असून  यामुळे या भागात मोकाट जनावरांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घराबाहेर निघणेही अवघड झाले आहे.

काहीवेळा तर अनेक वराह घराच्या आतमध्ये घुसून नासाडी करत आहेत तर कुत्र्यांचे टोळके रात्री किंवा सकाळच्या वेळेला नागरिकांवर धावा घेऊन चावा घेतात. या संदर्भात अनेकवेळा तोंडी संबंधित अधिकारी यांना माहिती दिली असता ते म्हणतात, या प्रकरणी आम्ही काही करू शकत नाहीत. त्यामुळे  आपण तात्काळ उपाययोजना करण्यास संबंधितांना सुचित करावे, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल व याची सर्व जबाबदारी आपणांवर राहील, असे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शहरप्रमुख गजानन मुडेगांवकर, जिल्हासंघटक राजेभाऊ लोमटे, तालुकाप्रमुख मदनलाल परदेशी, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख जयश्री पिंपरे, तालुकाप्रमुख रेखा घोबाळे, शहरप्रमुख वैशाली वाघमारे, उपशहर प्रमुख शिवकांत कदम, शहरसंघटक अशोक हेडे, शहर समन्वयक बाबा भिसे, माजी शहर समन्वयक अर्जुन जाधव, माजी तालुकाप्रमुख रमेश टेकाळे, युवासेनेचे अभिमन्यू वैष्णव, ॲड. विशाल घोबाळे, रत्नेश्वर वाघमारे, सोशल मीडिया प्रमुख नागेश सावंत, बाळासाहेब वाघाळकर आदींसह शिवसैनिकांची उपस्थिती होती.