मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात येणार वसतीगृह : राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात 100 विद्यार्थ्यांचं वसतीगृह सुरू करण्याचा निर्णय, राज्य सरकारनं घेतला आहे. यात 50 मुलं आणि 50 मुलींची राहण्याची सोय असेल.

राज्य सरकारनं मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी नेमलेल्या उपसमितीची काल चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. ज्या जिल्ह्यात ही वसतीगृह तयार आहेत किंवा जागा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी त्याचं नूतनीकरण करुन तातडीने सुरु करण्यात येतील, तसंच जिथे ही सुविधा उपलब्ध नाही तिथे खासगी संस्थांकडून निविदा प्रक्रिया राबवून ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, असा निर्णय उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.

मराठा विद्यार्थ्यांना देश – विदेशातल्या महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव विभागानं तयार करावा, अशा सूचना समितीनं दिल्या आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजाच्या मुला – मुलींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी देण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादाही 10 लाख रुपयांवरुन 15 लाख रुपये करण्यात आली आहे.