मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या गटासाठी ‘ढाल तलवार’ हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने मंजूर केलं आहे. या गटाने काल चिन्हासाठी दिलेले त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा हे तीनही पर्याय आयोगानं नाकारत, नवीन तीन पर्याय देण्यास सांगितलं होतं.
त्यानुसार सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड, हे तीन पर्याय या गटाने सादर केले होते. त्यापैकी सूर्य हे चिन्ह अन्य पक्षांना दिलेलं असल्याने आयोगाने नाकारलं. ‘ढाल तलवार’ हे चिन्ह मेघालयातल्या पीपल्स डेमोक्रेटिक मुव्हमेंट या पक्षाला देण्यात आलेलं होतं, मात्र 2004 मध्ये पक्षाची पात्रता रद्द झाल्यानं, हे चिन्ह बाद ठरवण्यात आलं.
शिवसेनेच्या या गटाचा अर्ज सादर झाल्यावर या चिन्हाचा मुक्त चिन्हांच्या यादीत समावेश करून, बाळासाहेबांच्या शिवसेनेला हे चिन्ह देत असल्याचं, आयोगानं याबाबत जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.