शिवसेना – काँग्रेसशी युती करण्यासाठी आम्ही तयार : ॲड. प्रकाश आंबेडकर

जालना : शिवसेना संकटात असताना प्रकाश आंबेडकरांनी युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी वगळून शिवसेना आणि काँग्रेसशी युती करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव असल्याचा पुनरुच्चार प्रकाश आंबेडकरांनी केला. 

राष्ट्रवादीशी युती करण्यास आमची का तयारी नाही हे योग्य वेळी सांगू, असेही त्यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी ते जालना इथे आले होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आंबेडकर म्हणाले, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रस्ताव दिला असला तरी शिवसेना आणि काँग्रेसकडून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांची भूमिका स्पष्ट होत नसल्याने निवडणुकांसाठी आम्ही आमची तयारी करीत आहोत. 

युतीसाठी आम्ही आमच्या पद्धतीनं शिवसेना आणि काँग्रेसकडे निरोप पाठविला असून आता काय करायचे, हा त्यांचा प्रश्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव स्वीकारणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.