‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ अंबाजोगाईत उत्साहात साजरा : संघर्षभूमी, ‘विश्वशांती महाविहार’ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

युवकांनी काढली भव्य बाईक महारॅली

अंबाजोगाई : ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ अंबाजोगाई शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. संघर्षभूमी चनई, ‘विश्वशांती महाविहार’, मांडवा रोड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंचशील ध्वज हाती घेऊन युवकांनीही शहरातून भव्य अशी बाईक महारॅली‌ काढली होती. शहरातील विविध प्रभागातील बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्धांना व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील विविध नगरातील नागरिकांनी संघर्षभूमीवर महामानवांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. बालक – बालीका,  युवक – युवती, महिला – पुरुष व जेष्ठ नागरिकांचा यात समावेश होता. सर्वांनी या ठिकाणी येऊन महामानवांच्या प्रतिमांना पुष्प तथा पुष्पहार अर्पण करून सहकुटूंब अभिवादन केले. तसेच सामुहीक त्रिसरण, पंचशील व 22 प्रतिज्ञा ग्रहण केल्या.

बाईक महारॅलीचा संघर्षभूमीवर उत्साहात समारोप 

शहरातील युवकांच्या वतीने आयोजित भव्य बाईक महारॅलीचा समारोप दुपारी संघर्षभूमी येथे झाला. पंचशील ध्वजासह महामानवांचा जयघोष करणारी ही रॅली शहरातील प्रमुख रस्त्यांनी होऊन संघर्षभूमीवर आली. याप्रसंगी संघर्षभूमी परिवाराच्या वतीने आयोजकांचे स्वागत करण्यात आले. जयभीम विचारमंचावर समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम संयोजकांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्प अर्पण करण्यात आले. नंतर प्रा. डॉ. किर्तीराज लोणारे यांनी उपस्थितांना तिसरण, पंचशील व 22 प्रतिज्ञा दिल्या.

याप्रसंगी विचारमंचावर संयोजन समितीचे नितीन सरवदे, स्वप्नील ओव्हाळ, सरगम मस्के, ब्रिजेश इंगळे, गोविंद जोगदंड यांची उपस्थिती होती. तर संघर्षभूमी परिवाराच्या वतीने दृपदाआई सरवदे, गुलाबराव गायकवाड, ॲड. संदीप थोरात, संजय हतागळे व प्रा. डॉ. गणेश सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. सरणतंय गाथेने या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास अंबाजोगाई शहर आणि तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘विश्वशांती महाविहार’ करिता सर्वोतोपरी सहकार्य करणार : आमदार नमिता मुंदडा

बुद्धिस्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने बुधवार, दिनांक 5 ऑक्टोबर 2022 रोजी नियोजित ‘विश्वशांती महाविहार’, ‘लुंबिनी पार्क’, मांडवा रोड, अंबाजोगाई येथे भव्य धम्म महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. धम्म महोत्सवात भदन्त धम्मसार (किल्लारी, जि. लातूर) यांचे धम्मदेसना – धम्मप्रवचन झाले तर उद्घाटक म्हणून ॲड. संघराज रूपवते (उच्च न्यायालय, मुंबई) आणि समारोप सत्रात आमदार नमिता मुंदडा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. ‘विश्वशांती महाविहार’ करिता सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे आमदार नमिता मुंदडा यांनी सांगितले.

धम्म महोत्सव उद्घाटन, धम्म प्रवचन, ‘स्वरविहार’ हा बुद्ध व भीमगीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम आणि समारोप अशा चार सत्रात आयोजित करण्यात आला होता. धम्म महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.