बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना दिले निवेदन
अंबाजोगाई : बंद पडलेल्या अंबाजोगाई उच्चशक्ती प्रेक्षपण केंद्रावरून ‘एफएम’ ची सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी अंबाजोगाईतील पत्रकार बांधवांच्या वतीने बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भात पत्रकारांच्या वतीने खा. मुंडे यांना दिनांक 26 सप्टेंबरला निवेदनही देण्यात आले आहे. यावेळी माजीमंत्री पंकजा मुंडे या देखील उपस्थित होत्या. खा. मुंडे यांनी या प्रश्नाबाबत सकारात्मकता दाखवत निश्चित पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन पत्रकारांना दिले.
पत्रकारांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबाजोगाईतील धायगुडा पिंपळा येथे असलेले उच्चशक्ती प्रेक्षपण केंद्र प्रसारभारतीने ऑक्टोबर महिन्यात बंद केले आहे. हे केंद्र बंद केले असले तरी या ठिकाणी असलेले मनुष्यबळ व यंत्रणा अजुनही कार्यान्वित आहे. या केंद्रावरूनच ‘एफएम’ ची सेवा सुरू केली तर या सेवेचा फायदा अंबाजोगाई, परळी, धारूर, केज, माजलगाव यासह आसपासच्या भागाला होईल. ‘एफएम’ सेवा सुरू करण्यासाठी या ठिकाणी एक ट्रान्समिटर आणि अँटेनाची आवश्यकता असून, हे ट्रान्समिटर प्रसारभारतीने केंद्रावर बसविले तर, निश्चितच या ठिकाणी ही सेवा सुरू होऊ शकते. आपण बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार आहात. या प्रश्नी आपण प्रसारभारतीच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा केला तर, हा प्रश्न मार्गी लागू शकतो. आपण हा विषय गांभीर्याने घेवून यासाठी प्रयत्न करावेत, ही विनंती, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर पत्रकार महादेव गोरे, रणजित डांगे, अ. र. पटेल, गोविंद खरटमोल, अविनाश मुडेगांवकर, प्रशांत बर्दापूरकर, रमाकांत पाटील, अभिजित गाठाळ, अशोक कचरे, परमेश्वर गित्ते, रमाकांत उडानशिव, शेख मुशीर बाबा, जोशी व्ही. बी., सय्यद नईम, मारुती जोगदंड, देविदास जाधव, मोहम्मद फैजान, सुभम खाडे, दिलीप अरसुळ, डॉ. संतोष बोबडे, सतिश मोरे, अतुल जाधव, विशाल आखाडे यांच्यासह आदींच्या सह्या आहेत.