नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली चलित मुद्रेतील बुद्ध मूर्ती दीक्षाभूमीवर अवतरणार आहे. थायलंड व म्यानमार या बौद्ध राष्ट्रातील दोन दानशूर बांधवांच्या मदतीने ही बुद्ध मूर्ती सध्या थायलंडमध्ये तयार होत आहे. 50 फूट उंच असलेली ही बुद्ध मूर्ती अष्टधातूंची असेल.
दीक्षाभूमी परिसरात आधीच एक बुद्धमूर्ती आहे. ती सुद्धा थायलंड येथून आलेली आहे. बाबासाहेबांना ध्यानस्थ मुद्रेतील बुद्ध मूर्तीऐवजी चलित मुद्रेतील बुद्ध अधिक आवडायचे. त्यामुळे त्यांना अभिप्रेत असलेली बुद्ध मूर्ती साकारण्यासाठी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी पुढाकार घेतला.
भंते ससाई आणि एस. के. गजभिये यांच्या प्रयत्नांतून ही बुद्ध मूर्ती साकारली जात आहे. यासाठी म्यानमारचे फादर थिएंगार व थायलंडच्या रविवान खनजनविसित्ता या दानशूर बौद्ध बांधवांनी मदतीचा हात दिला. मागील एक वर्षांपासून या मूर्तीचे नियोजन सुरू आहे. 50 फूट उंच असलेली ही अष्टधातूची मूर्ती 10 भागामध्ये थायलंडच्या चोनबुरी येथे तयार होत आहे.
ही मूर्ती तयार झाल्यानंतर जहाजातून ती मुंबईला येईल. तेथून रस्ते मार्गाने नागपूरला पोहोचेल. दहा भागातील ही बुद्धमूर्ती दीक्षाभूमीवर जोडली जाईल. या कामासाठी थायलंडचेच इंजिनीअर नागपूरला मूर्तीसोबतच येतील.
नागपुरातील दुसरी चलित बुद्ध मूर्ती
नागपुरातील ही दुसरी चलित बुद्ध मूर्ती असेल. यापूर्वी नागलोक परिसरात चलित बुद्ध मूर्ती साकारण्यात आली आहे. यानंतर आता दीक्षाभूमीवरही चलित मूद्रेतील बुद्ध मूर्ती साकारली जाणार आहे.
4 ऑक्टोबरला भूमिपूजन
बुद्ध मूर्तीसाठी दीक्षाभूमीवरील जागा अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र लक्ष्मीनगर चौक ते चित्रकला महाविद्यालय या मार्गाकडील जागेवर ती उभारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येत्या 4 ऑक्टोबर रोजी त्याचे भूमिपूजन होणार आहे. यासाठी खास थायलंड येथील एक शिष्टमंडळ दीक्षाभूमीवर येणार आहे.