मुंबई : टिप्स इंडस्ट्रीजच्या वतीने अष्टपैलू कलाकार निळू फुले यांच्यावर बायोपिकची निर्मिती करण्यात येत आहे. अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ता हे दोन्ही कार्य त्यांनी कसे पार पाडले, हे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या मराठी लोकनाट्याने केली.
एका अभिनेत्याचे जीवन, त्यांच्या जीवनातील चढ – उतार आणि आवडलेल्या गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी केलेले त्याग ह्या गोष्टी यात असतील. प्रसाद ओक या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.
टिप्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक कुमार तौरानी म्हणाले, ‘मराठी चित्रपटसृष्टीत निळू फुले यांचे खूप मोठे योगदान आहे आणि हा चित्रपट त्यांच्यासाठी एक सन्मान आहे. आम्ही त्यांची मुलगी गार्गी फुले यांच्याकडून चित्रपटासाठीचे हक्क मिळवले आहेत आणि लवकरच चित्रीकरणाला सुरुवात करणार आहोत’. दिलीप अडवाणी आणि नेहा शिंदे हे या चित्रपटाचे सहनिर्माते असून सहयोगी निर्माते आहेत अविनाश चाटे, अरिजीत बोरठाकूर आणि तन्नाज बंडुकवाला. हा बायोपिक 2023 मध्ये प्रदर्शित होईल.