परळी, केज, धारुरसह आसपासच्या तालुक्यालाही सेवेचा होईल लाभ
अंबाजोगाई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात प्रसार भारतीला अधिक महत्त्व आले असले तरी अंबाजोगाई येथील धायगुडा पिंपळा या ठिकाणी असलेले प्रसार भारतीचे उच्च शक्ती प्रेक्षपण केंद्र बंद करण्यात आले आहे. या बंद पडलेल्या केंद्रावरच ‘एफएम’ ची सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी शहरातील काही रेडिओ प्रेमींनी केली आहे. ही सुविधा या केंद्रावरुन सुरू झाल्यास निश्चितच अंबाजोगाईसह परळी, केज, धारुरसह आसपासच्या तालुक्यालाही याचा लाभ मिळणार आहे.
अंबाजोगाई शहराला सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि शैक्षणिक वारसा असल्याने शहरात आणि शहरापासून 80 किलोमीटर अंतरावरील जनतेला दूरदर्शन वाहिनीचे कार्यक्रम अधिक चांगल्या प्रकारे पहाता यावेत या उदात्त हेतूने पसतीस वर्षींपुर्वी धायगुडा पिंपळा या ठिकाणी 10 हजार वॅटच्या उच्च शक्ती प्रक्षेपण केंद्राची प्रसार भारतीने उभारणी केली. त्यानंतर त्यावेळेस दूरदर्शनने सुरू केलेल्या डीडी न्यूज या स्वतंत्र वाहिनीसाठी प्रसार भारतीचे तत्कालीन केंद्रीय मंत्री स्व. प्रमोद महाजन यांच्या पुढाकाराने 10 हजार वॅटचे स्वतंत्र ट्रान्समीटर या केंद्रात बसविण्यात आले. त्यामुळे डीडी न्यूज ही वाहिनी आपल्या परिसरात पाहता येवू लागली आणि त्यामुळेच हे केंद्र महाराष्ट्रातील प्रमुख पाच केंद्रापैकी एक केंद्र म्हणून गणले जावू लागले होते.
राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या नंतर अंबाजोगाई येथील उच्च शक्ती प्रेक्षपण केंद्राचा क्रमांक लागत होता. मात्र, प्रसार भारतीने गेल्या काही महिन्यांत हे उच्च शक्ती प्रेक्षपण केंद्र बंद केले आहे. केंद्र बंद केल्यामुळे तेथील काही यंत्रसामग्री इतरत्र हलविण्यात आली असली तरी कर्मचारी आणि उर्वरित ढाचा आहे तसाच आहे. त्यामुळे या केंद्रावरुन ‘एफएम’ ची सुविधा सुरु करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
‘एफएम’ रेडिओ, आकाशवाणीचे कार्यक्रम 80 किलोमीटर पर्यंत ऐकता येवू शकतील
देशात व राज्यात खासगी वाहिन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहेत. पण त्यातच दूरदर्शन आणि आकाशवाणीची विश्वासाहर्ता आजही टिकून आहे. अंबाजोगाई येथील उच्च शक्ती प्रेक्षपण केंद्रावरुन ‘एफएम’ रेडिओचे प्रसारण सुरू करण्यासाठी 5 हजार वॅटच्या स्वतंत्र ट्रान्समीटरची आणि अँटीनाची आवश्यकता आहे. हे ट्रान्समीटर बसविले आणि मुबलक मनुष्यबळ उपलब्ध झाले तर ‘एफएम’ रेडिओ आणि आकाशवाणीचे कार्यक्रम 80 किलोमीटर पर्यंत ऐकता येवू शकतील.
पाठपुरावा करण्याची गरज
यासंदर्भात मागील काही महिन्यात ग्राहक पंचायत समितीच्या सदस्यांनीही ‘एफएम’ चालू करण्याची मागणी प्रसार भारतीचे मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बीड जिल्ह्याच्या खासदार प्रितम मुंडे यांनी अंबाजोगाई येथील उच्च शक्ती प्रेक्षपण केंद्रात अत्याधुनिक यंत्रसामग्री त्यासोबत केंद्राच्या विकासासाठी आणि ‘एफएम’ रेडिओचे प्रसारण सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे, अशी मागणी होत आहे.