मुलं पळविण्याच्या टोळीच्या केवळ अफवा : नागरिकांनी घाबरु नये – अंबाजोगाई शहर पोलिस

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात गेल्या दोन – तीन दिवसांपासून मुलं पळविण्याच्या टोळीच्या पोस्ट समाजमाध्यमात फिरत आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. बऱ्याच पालकांनी या भितीपोटी विद्यार्थ्यांना शाळेतही पाठविणे बंद केले होते, अशी माहिती समोर येत आहे.

अंबाजोगाई शहर पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली असता त्यांच्या लक्षात आले की, या केवळ अफवा आहेत. या अफवांच्या पोस्ट खातरजमा न करता अनेक जण समाजमाध्यमात शेअर करित आहेत. त्यामुळे नागरिकांतही भितीचे वातावरण पसरत आहे. या संदर्भात अंबाजोगाई शहर पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. 

अंबाजोगाई शहरात मुलं पळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या पोस्ट समाजमाध्यमात फिरत आहेत. परंतू, याची खात्री केली असता सर्व अफवा असल्याचे लक्षात आले, तरी कोणीही नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, अशी मुले पकडणारी कोणतीही टोळी अस्तित्वात नाही. ज्या व्यक्ती अशा खोट्या अफवा पसरवतील त्यांच्या विरूद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असं अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ‌‌बी. एन. पवार यांनी सांगितले आहे.