मुंबई : ‘हवाहवाई’ या मराठी चित्रपटाची चर्चा आहे. महेश टिळेकर यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केलं आहे. ‘द ग्रेट इंडियन किचन’ या मल्याळम सिनेमातील अभिनेत्री निमिषा संजयनचं मराठीत पदार्पण होत असून या चित्रपटाचा ट्रेलर भेटीला आला आहे. मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईनटिन नाईन प्रॉडक्शन्सचे विजय शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
या चित्रपटात एका मध्यमवर्गीय गृहिणीची संघर्षमय कथा असल्याचे दिसते. आयुष्यात चैनीत राहता आलं नाही तरी चालेल सुखाने जगता आलं पाहिजे, ही भावना चित्रपटाची नायिका ज्योती हीची आहे. आयुष्यात आलेल्या एका संकटामुळे ज्योती घरसंसार सांभाळून फूडस्टॉल सुरू करण्याचा निर्णय घेते, असे ट्रेलरमध्ये दिसते.
सामान्य गृहिणी असलेल्या ज्योतीच्या ध्येयपूर्तीचा प्रवास नेमका कोणत्या वळणावर जातो हे बघणे औत्सुक्यपूर्ण ठरणार आहे. या चित्रपटात वर्षा उसगावकर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. संजीवनी जाधव, किशोरी गोडबोले, समीर चौघुले, अतुल तोडणकर, सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, मोहन जोशी, स्मिता जयकर, गार्गी फुले, प्राजक्ता हनमघर, पूजा नायक, सीमा घोगळे, बिपिन सुर्वे, विजय आंदळकर, अंकित मोहन या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.
गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 88 व्या वर्षी या चित्रपटातलं उडत्या चालीचं एक गाणं गायलं आहे. गायिका उर्मिला धनगर हिच्या ठसकेबाज आवाजातही एक गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे. चित्रपटाचे संगीत पंकज पडघन यांचे असून चित्रपटातील गीते महेश टिळेकर यांनी लिहिली आहेत. कला दिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. कार्यकारी निर्माता म्हणून अभिजित अभिनकर यांनी काम पाहिले असून नृत्य दिग्दर्शन सॅन्डी संदेश यांचे आहे.