‘लंपी’ आजारावरील लस सर्वत्र मोफत उपलब्ध करून द्या : ॲड. माधव जाधव

मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांच्याकडे केली मागणी

अंबाजोगाई : महाराष्ट्रामध्ये सध्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचा कणा असलेला पशु – प्राणी यात  प्रामुख्याने गाय, बैल व म्हैस या पाळीव प्राण्यांना ‘लंपी’ आजाराने पछाडले आहे, त्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्ग त्रस्त झालेला आहे. 

अगोदरच दुष्काळी परिस्थिती, गोगलगायींचे संकट, दुबार – तिबार पेरणीचे संकट तसेच पावसाने उघड दिल्यामुळे पिकांचे झालेले नुकसान, अतिवृष्टीमुळे काही भागांमध्ये झालेले पिकांचे नुकसान व पिकांवरील वेगवेगळ्या प्रकारचे संकट यामुळे शेतकरी बांधव संकटात असताना शेतकऱ्यांचा कणा असलेले गाय, बैल व म्हैस इत्यादी पाळीव प्राण्यांना ‘लंपी’ आजाराने पछाडले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचा कणा मोडकळीस आलेला असून शेतकरी बांधव प्रचंड संकटात आहे.  

‘लंपी’ आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक असणारी लस ही बीड जिल्ह्यांमध्ये व इतरही काही जिल्ह्यांमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकरी खूप अडचणीत सापडलेला आहे व लसीचा काळाबाजार होत असून शेतकऱ्यांची लुबाडणूक होत आहे.

सरकारने ताबडतोब ‘लंपी’ आजारासाठी असणारी आवश्यक लस ही सर्व शेतकरी बांधवांना मोफत उपलब्ध करून द्यावी व लसीचे वाटप तहसील कार्यालयामार्फत तलाठी, मंडळ अधिकारी व ग्रामसेवक व तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत गरजूंना मोफत देण्यात यावी. यासाठी ताबडतोब उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. अन्यथा मराठवाड्यातील शेतकरी बांधवांच्या आत्महत्यामध्ये भर पडणार आहे.

शेतकरी बांधवांच्या पाळीव प्राण्यांवर आलेले ‘लंपी’ आजाराचे संकट दूर करण्यासाठी शेतकरी बांधवांना मोफत लसीचे वितरण ताबडतोब करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. मराठवाडा अध्यक्ष किसान काँग्रेस तथा काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड सदस्य ॲड. माधव जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री अब्दुलजी सत्तार यांना निवेदनाची प्रत ईमेल केली आहे.