मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन‌ उत्साहात साजरा : अंबाजोगाईतील ऐतिहासिक बुरुजावर झाले ध्वजारोहण

मराठवाडा जनता विकास परिषदेचा पुढाकार : स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटूंबियांचा सत्कार

अंबाजोगाई : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन‌ अंबाजोगाईत उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. शहरातील ऐतिहासिक अशा शहा बुरुजावर आज सकाळी डॉ. नरेंद्र काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या अंबाजोगाई शाखेनं यासाठी पुढाकार घेतला होता.

स्वातंत्र्यसैनिक श्रीनिवास खोत यांनी 1942 च्या आंदोलनात या बुरुजावरचा निजामाचा रेडिओ उध्वस्त केला होता. ढासळत असलेल्या या बुरुजाची स्थानिक प्रशासनाच्या मदतीने साफसफाई करून, तात्पुरत्या पायऱ्या उभारण्यात आल्या होत्या. सायंकाळनंतर हा बुरूज तिरंगी प्रकाशात न्हाऊन निघाला होता.

सर्वसामान्य नागरिकांना हा इतिहास माहित व्हावा आणि या बुरुजासह अशा ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन व्हावं, या हेतूनं या बुरुजावर ध्वजारोहणाचा निर्णय घेतल्याचं, मराठवाडा जनता विकास परिषदेचे अंबाजोगाई शाखेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी सांगितलं.  

शहरातील पोलिस परेड मैदानावर अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राजकीय, शैक्षणिक, पत्रकारितासह सर्वच क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिस्कर यांनी मराठवाडा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

शहरातील विविध शासकीय – निमशासकीय कार्यालयात, शाळा – महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. त्यासोबतच व्याख्यानासह विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. 

स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटूंबियांचा सत्कार

हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्याने स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी व मुलांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी शरद झाडके, संजय सिरसाट, नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड, मुख्याधिकारी अशोक साबळे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, डॉ. नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटूंबियांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात महानंदा बुरांडे, प्रतिभा ठाकूर, डॉ. दिलीप खेडगीकर, डॉ. रत्नाकर काळेगावकर, व्यंकट पवार, पंडितराव भोसले, महानुभाव, विडेकर यांचा शाल, पुष्पगुच्छ व एक पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.