अंबाजोगाईच्या भुमीपुत्रांचा ‘हिमालियन व्हेगन’ फेस्टिव्हलमध्ये डंका : ‘उर्वरा’ माहितीपटाचे‌ होणार प्रसारण ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌

अंबाजोगाई : जगभरातील हवामान संकटाचे परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी असणारी शेती पध्दती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर येथील सुभाष पालेकर यांच्या नैसर्गिक शेती प्रयोगाच्या आधारावर अंबाजोगाईच्या भुमिपुत्रांनी बनवलेल्या ‘उर्वरा’ या माहितीपटाचे प्रसारण जगातील सर्वात पहिल्या आणि महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘हिमालियन व्हेगन’ फेस्टिव्हलमध्ये होणार असल्यामुळे अंबाजोगाई येथील तीन भुमिपुत्रांच्या कार्याचा डंका आता ‘हिमालियन व्हेगन’ फेस्टिव्हलमध्ये वाजणार आहे.

‘हिमालियन व्हेगन’ फेस्टिव्हलमध्ये प्रसारित होणाऱ्या ‘उर्वरा’ या माहितीपटाचे दिग्दर्शन राहुल नरवणे, संगीत ओंकार रापतवार तर स्क्रीप्ट डायरेक्शन आनंद कुलकर्णी या तीन तरुण दिग्दर्शकांनी केले आहे. संपूर्ण भारत आणि जगभरातील हवामानातील संकटांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणीय स्थिरता आणि अन्न सुरक्षा ह्या आपल्यासमोरील आव्हानात्मक समस्या आहेत. आज एक कृषीप्रधान देश म्हणून भारतासाठी सतत आर्थिक वाढ होणे अशक्य आहे, कारण मानवी कृत्यांमुळे माती नष्ट होत आहे, परागकण नाहीसे होत आहेत, जैवविविधता आणि परिसंस्था नष्ट केल्या आहेत. या सगळ्यासाठी कारणीभूत असणाऱ्या रासायनिक शेतीच्या त्रासाखाली महाराष्ट्रातील शेतकरी रामहरी कदम हे शेतकरी गटाला त्यांच्या जागेवर पुन्हा हक्क मिळवून देण्यासाठी सक्षम करण्याच्या मोहिमेवर सज्ज झाले आहेत. पौष्टिक आणि शाश्वत अन्न प्रणाली अबाधित राहण्यासाठी नैसर्गिकतेची कास धरणारे संक्रमण शेती तंत्र त्यांनी विकसित केले आहे. 

महाराष्ट्रातील गोपाळपूर, पंढरपूर येथे राहणारे, रामहरी कदम यांनी किशोरवयातच वडिलोपार्जित शेती करण्यास सुरुवात केली आणि शेतीतच पदविका अभ्यास पूर्ण केला. आपल्या साडेचार एकर जमिनीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याच्या प्रयत्नात रामहरीने सुरुवातीला रासायनिक शेतीपद्धतीतील विविध तंत्रज्ञानाचा वापर करत रासायनिक खत कंपनीसाठी डीलरशिपसुद्धा घेतली. परंतू, काही वर्षांतच त्यांचा भ्रमनिरास झाला.

रासायनिक शेतीचे परिणाम धक्कादायक होते. मातीची गुणवत्ता ढासळणे, शेतातील पाण्याचे प्रमाण कमी होणे आणि पीक निकामी होणे यांसारखे भीषण प्रकार समोर आले. हाच अनुभव त्याला पर्यायी शेती पद्धती शोधण्यासाठीच्या एका वेगळ्या प्रवासाकडे घेऊन गेला आणि शेवटी त्याला मूर्त सकारात्मक उत्तर सापडलेच. ज्याचे नाव होते नैसर्गिक शेती. नैसर्गिक शेतीच्या तंत्रांची अंमलबजावणी करण्यास त्यांनी सुरुवात केली, ह्याचवेळी त्यांना पुण्यातील ‘जीवभावना’ संस्थेविषयी समजले आणि सुरु झाला ह्या संस्थेसोबतचा त्यांचा अनोखा प्रवास. ‘उर्वरा’ या नावाने एक मॉडेल त्यांनी उभे केले आणि त्याचे मुख्य शेतकरी म्हणून भारतीय शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर काम करत शेतकऱ्यांना शाश्वत, नैतिक आणि नैसर्गिक शेती पद्धतींकडे नेणारा एक सक्षमीकरण कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. ‘उर्वरा’ चा पायलट प्रोजेक्ट म्हणून आज रामहरी कदम यांनी आपल्या शेतातील पाण्याची पातळी, मातीची गुणवत्ता आणि जैवविविधता यशस्वीपणे पुनरुज्जीवित केली आहे.

‘उर्वरा’ हे पद्मश्री पुरस्कार विजेते सुभाष पाळेकर यांनी घडवलेल्या नैसर्गिक शेतीच्या यशस्वी मॉडेलवर आधारित आहे. प्रतिष्ठित अश्या युएन ने जगभरातील हवामान संकटाचे परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी असणारी शेती पद्धती म्हणून घोषितही केले आहे. यालाच SPNF (सुभाष पालेकर नैसर्गिक शेती) असेही म्हटले जाते. हे मॉडेल रामहरीच्या शेतात राबविण्यात आले आहे. ह्याच सर्व प्रकल्पाची माहिती देणारा आणि संपूर्ण पद्धतीची स्पष्टता देणारा माहितीपट पुण्यातील दृश्यम कम्युनिकेशन्स ह्या प्रॉडक्शन हाऊसने ‘जीवभावना’ संस्थेसोबत बनवला आहे. यासाठी दृश्यम कम्युनिकेशन्सची संपूर्ण टीम गेले वर्षभर विविध पातळीवर काम करत आहे.

‘जीवभावना’ आणि दृश्यम ह्यांच्या प्रयत्नांचे फलित म्हणून काठमांडू, नेपाळमध्ये आयोजित केलेल्या जगातील सर्वात पहिल्या आणि महत्वाच्या ‘हिमालयन व्हेगन’ फेस्टिव्हलमध्ये शुक्रवार,16 सप्टेंबरला तो प्रसारित केला जाणार आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शक आणि ‘उर्वरा’ समर्थक दृश्यम कम्युनिकेशन्सचे राहुल नरवणे नेपाळ येथे ह्या माहितीपटावर भाष्य करणार आहेत. यांच्यासोबत सर्व उपस्थित चर्चासुद्धा करणार आहेत. शेतीच्या भविष्याभोवती सार्वजनिक स्तरावर एकत्र येण्याची नितांत गरज आहे, त्यासाठी हा माहितीपट महत्त्वाचे पाऊल म्हणून सर्वत्र गाजत आहे.