अंबाजोगाई : गुजरातमधील दंगलीत गर्भवती असलेल्या बिल्कीस बानो या महिलेवर बलात्कार करून तिच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 11 आरोपींची गुजरात सरकारच्या माफी धोरणानुसार गत महिन्यात स्वातंत्र्यदिनी सुटका करण्यात आली. या सुटकेच्या निषेधार्थ आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी अंबाजोगाईत गुरुवारी (दि.15) महिलांचा भव्य निषेध मूकमोर्चा निघाला. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला आणि मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.
शहरातील सदरबाजार शादीखाना येथून सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. हा मूकमोर्चा गवळीपुरा, मंडी बाजार, पाटील चौक, बसस्थानक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात हजरत मोहम्मद (स.) यांच्याबद्दल सारखं अपमानजनक टिप्पणी करणाऱ्यांवर कडक कायदा लागू करणे, बिल्कीस बानोवर बलात्कार करणारे व त्यांच्या नातेवाईकांंचा खून करणाऱ्या 11 जणांची सुटका रद्द करुन पुन्हा कठोर शिक्षा देणे, भारतातील अल्पसंख्याक समुदायावर होणाऱ्या अत्याचारा विरोधात कडक कायदा लागू करा यासह विविध मागण्यांचे निवेदन महिलांच्या वतीने देण्यात आले. निवेदन नायब तहसीलदार गणेश सरोदे यांनी स्विकारले. सदरिल निवेदन उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रोपदी मर्मु यांना पाठविण्यात येणार आहे.
यावेळी प्रा. शैलेजा बरुरे आणि काही महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात बिल्कीस बानो प्रकरणातील 11 जणांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत गुजरात सरकारचा निषेध करण्यात आला.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
अंबाजोगाईतील मोर्चाच्या पार्श्र्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मोर्चाच्या मार्गावर जागोजागी पोलिस तैनात करण्यात आले होते. उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोरही पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.