अशोक सराफ यांनी नाट्य – सिने क्षेत्रात एव्हरेस्ट सर केले : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

मुंबई : आपण हिमालयाच्या कुशीत जन्मलो. मात्र आपल्याला कला, साहित्य व संगीत शिकण्याचे भाग्य लाभले नाही. अशोक सराफ यांनी त्याउलट आपल्या कलेच्या जोरावर नाट्य – सिने क्षेत्रात एव्हरेस्ट सर केले, असे सांगताना युवकांनी कुठल्याही क्षेत्रात काम करावे परंतु, अशोक सराफ यांच्याप्रमाणे निवडलेल्या क्षेत्रामध्ये उंची गाठण्याचा ध्यास घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.    

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते 55 व्या युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  

यावेळी राज्यपालांच्या हस्ते वयाची 75 वर्षे तसेच चित्रपट – रंगभूमीवरील 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा निवेदिता जोशी – सराफ यांचेसह सत्कार करण्यात आला. 

देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना अशोक सराफ वयाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहेत. आगामी काळ देशासाठी तसेच अशोक सराफ यांचेसाठी देखील अमृत काळ ठरेल, अशी आशा व्यक्त करताना युवकांनी अशोक सराफ यांच्या अद्भुत कार्यातून  प्रेरणा घ्यावी, असे आवाहन राज्यपालांनी केले. 

लोकांचे प्रेम हीच ऊर्जा : अशोक सराफ

मुंबई विद्यापीठाच्या वतीने राज्यपालांच्या हस्ते झालेल्या सत्कारामुळे आपण भारावलो. लोकांचे प्रेम हीच ऊर्जा आहे, असे सांगताना ‘तुम्ही लोकांनी मला इथपर्यंत आणून ठेवलं’ अशी भावना सराफ यांनी यावेळी व्यक्त केली.   

कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, निवेदिता जोशी – सराफ, विविध विभागांचे अधिष्ठाता, शिक्षक तसेच युवा महोत्सवात सहभागी होणारे विद्यार्थी, कलाकार उपस्थित होते. निलेश सावे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सुनील पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.