अंबाजोगाई : शिक्षणातूनचं मूलभूत हक्क, कर्तव्याची जाणीव निर्माण होते, असे प्रतिपादन न्यायाधीश शिवदत्त पाटील यांनी केले.
अंबाजोगाई तालुका विधी सेवा समिती, वकील संघ, अंबाजोगाई आणि कला व वाणिज्य महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 सप्टेंबरला कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी न्यायाधीश शिवदत्त पाटील बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. अखिला सय्यद, ॲड. शरद लोमटे, ॲड. अशोक कुलकर्णी, ॲड. शिवाजी कांबळे, ॲड. अनंत तिडके, प्रा. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना न्यायाधीश शिवदत्त पाटील म्हणाले की, विद्यार्थीनींमध्ये कायदेविषयक जनजागृती झाली पाहिजे, महाविद्यालयीन विद्यार्थीनींमध्ये ॲसिड हल्ला या गुन्ह्याबाबत प्रबोधन होणे आवश्यक आहे, अशा पध्दतीच्या गुन्ह्यापासुन अलिप्त राहिले पाहिजे.
या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अखिला सय्यद यांनी असे सांगितले की, नैतिक दृष्ट्या सबळ समाज निर्मितीसाठी तरुणींनी पुढाकार घ्यावा. ॲसिड हल्ला या कायद्याबाबत वकील संघाचे ॲड. अनंत तिडके यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच ॲड. अशोक कुलकर्णी यांनी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. शिवाजी कांबळे यांनी केले. प्रा. डॉ. यशवंतराव चव्हाण यांनी सुत्रसंचालन केले तर आभार प्रा. काशिद यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थिनी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.