अंबाजोगाई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘महावितरण’ च्या अभियंत्यांना दिनांक 7 सप्टेंबरला निवेदन देण्यात आले. शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासह विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
या निवेदनात म्हटले आहे की, ‘महावितरण’ विभागीय कार्यालयाच्या सरंक्षक भिंतीच्या पाठीमागे पूर्वेला संत कबीरनगर निवासी वस्ती आहे. आपल्या कार्यालयाच्या आवारात सरंक्षक भिंतीच्या जवळ असणाऱ्या काटेरी झाडे, वेली यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या झाडे, वेलीवरील विषारी सर्प, सरडे, विषारी किडे या वस्तीत जात आहेत. तसेच या झाडांच्या खाली आपल्या कार्यालयाच्या आवारातील विजेचे खांब, तार आहेत. यामध्ये सतत 24 तास विद्युत प्रवाह चालू असतो. ही सर्व झाडे, वेली वस्तीच्या बाजूला असलेल्या घरावरील लोखंडी पत्रे यांच्यावर पडलेली आहेत. त्यामुळे भविष्यात या खांबामुळे, तारेमुळे विद्युत शॉक लागून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.
अशीच परिस्थिती मिलिंदनगर भागात आहे. या भागातील रहिवासी रवी गायकवाड यांच्या घरासमोरचा लोखंडी खांब हा धोकादायक बनला आहे. यात सतत विद्युत प्रवाह उतरत आहे. या ठिकाणी लहान बालके, वयोवृद्ध व्यक्ती ये – जा करत असताना अचानक या खांबास स्पर्श करून जातात. त्यामुळे भविष्यात काही जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तो खांब तात्काळ काढून टाकून इतरत्र हलवावा.
तीन – चार दिवसांपूर्वी मिलिंदनगर येथील एका मुलीचा पाणी भरताना विद्युत शॉक लागून मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुन्हा असा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आपण योग्य ती दक्षता घेऊन शहरातील नागरिकांच्या जीवांचे रक्षण करावे, आपल्या कार्यालयाच्या दुर्लक्षामुळेच तो अनुचित प्रकार घडला असून यापुढे आपण योग्य ती खबरदारी घेऊन कबीरनगर येथील आपल्या कार्यालयाच्या आवारातील झाडे तोडावीत, मिलिंदनगरचा खांब तात्काळ हटवावा हि विनंती. अन्यथा येत्या 8 दिवसात आपल्या कार्यालयाला वंचित बहुजन आघाडी टाळे ठोकील याची नोंद घ्यावी, असा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर जोगदंड, शहराध्यक्ष गोविंद मस्के, शहर महासचिव नितीन सरवदे, शहर सहसचिव गोविंद जोगदंड, रवी गायकवाड, ब्रिजेश इंगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.