नवी दिल्ली : शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्याची परवानगी देण्याबाबत आदेश देण्याच्या मागणीसाठी शिंदे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ येत्या 27 सप्टेंबरला सुनावणी घेणार आहे. मूळ शिवसेना कोणाची हे ठरवण्याच्या मुद्द्यावर सध्या निवडणूक आयोगाकडे अर्ज प्रलंबित आहे.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे यावर सुनावणी प्रलंबित आहे. त्यामुळे तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी करणारा अर्ज शिंदे गटाकडून काल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला होता. त्यावर सरन्यायाधीश उदय लळीत यांनी घटनापीठाची स्थापना करुन आज त्यासमोर सुनावणी झाली. पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असंही न्यायालयानं सांगितलं आहे.
शिंदे गटाचे वकील कौल यांनी निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली. त्यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी, ज्यांच्या विधानसभा सदस्यांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे, त्यांना निवडणूक आयोगावर धाव घेण्याचा अधिकार नाही, असा मुद्दा मांडला. यावर घटनापीठ येत्या 27 तारखेला निर्णय घेण्याची शक्यता आहे.