मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ‘पोन्नयिन सेल्वन -1’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा ट्रेलर तामिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात 10 व्या शतकाचा इतिहास दाखवण्यात आला आहे.
ऐश्वर्या राय बच्चन ‘पोन्नियिन सेल्वन’ मध्ये राणी नंदिनीची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमधील ऐश्वर्याच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 30 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
कल्की कृष्णमूर्ती यांच्या ऐतिहासिक महाकाव्यावर ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटाचे कथानक आधारित आहे. चोल साम्राज्याची कथा या चित्रपटामधून मांडण्यात आली आहे. चित्रपटात अभिनेता चियान विक्रम यांच्या ट्रेलरमधील लूकनं आणि फिटनेसनं अनेकांचे लक्ष वेधले.
ट्रेलरच्या शेवटी दिसत आहे की, ऐश्वर्या ही सिंहासनाला पाहात आहे. याचा अर्थ या चित्रपटामध्ये सिंहासनासाठी होणारी लढाई दाखवण्यात येणार आहे. ऐश्वर्या आणि विक्रम यांच्यासोबतच अभिनेत्री शोभिता धूलिपाला आणि जयम रवी हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.