आणखी 7 हजार पोलिसांची भरती केली जाईल
मुंबई : राज्यात सध्या सात हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, याशिवाय आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाईल, अशी घोषणा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. याबाबतची लक्षवेधी सूचना मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आणखी पोलीस भरतीची आवश्यकता असल्याची मागणी केली होती.
अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर इथं एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारासाठी कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याची विभागीय चौकशी तीन महिन्यात करून त्यानंतर त्याच्या बडतर्फीची कारवाई करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भाजप आमदार नितेश राणे यांनी यासंदर्भार लक्षवेधी उपस्थित केली होती.
विधानभवन परिसरात काल शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. या शेतकऱ्याला ते भेटायला गेले असता रुग्णालयाच्या परिसरात रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांसाठी भौतिक सुविधा नसल्याकडे त्यांनी सदनाचं लक्ष वेधलं. यावर राज्यातल्या रुग्णालयात सल्लागार समित्या स्थापन कराव्या, अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.