टीम AM : मराठी सिनेसृष्टीत यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे ओळखले जातात. एक निर्माता आणि पटकथा लेखक असणारे नागराज पोपटराव मंजुळे यांचा आज वाढदिवस. आयुष्यात येणाऱ्या चढउतारांवर मात करत यशाची उंची गाठणाऱ्या नागराज यांनी आत्तापर्यन्त एकापेक्षा एक सरस आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आहेत.
नागराज पोपटराव मंजुळे यांचा जन्म 24 ऑगस्ट 1977 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर या गावी झाला होता. त्यांची घरची परिस्थिती ही बेताची होती. घरातील गरिबीमुळे नागराजचे वडील पोपटराव यांनी नागराज यांना त्यांचे भाऊ बाबुराव मंजुळे यांच्याकडून दत्तक घेतले होते. लहानपणापासून त्यांना अभ्यासामध्ये फार रस नव्हता. ते शाळेचे दप्तर एका ठिकाणी लपवून चित्रपट पहायला मित्रांसोबत जात असतं. सिनेमांचे वेड त्यांना लहानपणापासूनच होते.
नागराज यांच्या घरात कुणीच जास्त शिकलेलं नव्हतं. मात्र, तरी ही परिस्थितीशी झुंज देत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण जेऊरमधून पूर्ण केलं होत. पुढील शिक्षणासाठी ते पुणे विद्यापीठात शिकायला आले. नंतर त्यांनी मराठी विषयात एम.ए. आणि पुढे एम.फिल पूर्ण केले. मात्र, चित्रपट निर्मितीचा ध्यास त्यांना शांत बसू देत नव्हता. त्यासाठी त्यांनी नगरच्या महाविद्यालयात मास कम्युनिकेशन स्टडीजचा दोन वर्षांचा कोर्स पूर्ण केला.
नागराज मंजुळे यांनी आत्तापर्यन्त जे चित्रपट बनवले ते नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण व विशेष राहिले. त्यांच्या चित्रपटामध्ये प्रामुख्याने चित्रपट सृष्टीशी संबन्ध नसलेले स्थानिक कलाकार असतात. समाजातल्या सामाजिक भेदभाव आणि परिणामी आर्थिक अडचणींवर आधारलेला ‘पिस्तुल्या’ हा त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार विजेता लघुपट आहे. नागराज यांचा ‘फॅन्ड्री’ हा पहिला चित्रपट फेब्रुवारी 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. तो भरपूर गाजला. त्यानंतर मंजुळे यांच्या प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ चित्रपटानं इतिहास घडवला.
100 कोटींपर्यंत मजल मारणारा हा पहिला मराठी चित्रपट. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील उत्पन्नांचे सर्व विक्रम मोडीत काढले. 66 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाची वाहवा झाली. या चित्रपटाला अजय – अतुल यांनी दिलेले संगीत प्रचंड लोकप्रिय झाले. याच वर्षी ‘सैराट’ वर आधारलेला ‘धडक’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पावसाचा निबंध’ या लघुपटालाही 2017 मधील राष्ट्रीय पुरस्कारांद्वारे गौरविले गेले होते.
नागराज मंजुळे यांच्या मराठी कवितांवर आधारित ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ या पुस्तकाला 2011 मध्ये भैरूतन दामाणी साहित्य पुरस्कार, 2014 मध्ये नारायण सुर्वे काव्य प्रतिभा पुरस्कार जाहीर झाला होता. विशेष म्हणजे नागराज यांची ‘पिस्तुल्या’ ही शॉर्ट फिल्म येण्याआधी त्यांचा हा कविता संग्रह प्रकाशित झाला होता. त्यांच्या या कविता संग्रहातील कविता देखील प्रसिद्ध झाल्या होत्या.
दिग्दर्शक नागराज मंजुळे हे महानायक अमिताभ बच्चन यांचे लहानपणापासूनच मोठे फॅन आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचे त्यांचे स्वप्न हे ‘झुंड’ चित्रपटामुळे पूर्ण झाले. ‘झुंड’ हा सिनेमा स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. ‘झुंड’ हा चित्रपट 4 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. याही चित्रपटाला चित्रपट श्रोत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.
महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांच्याही महत्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. याही चित्रपटाची चित्रपट समीक्षकांनी वाहवा केली होती. नागराज मंजुळे यांना आपल्या समुहातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.