पावसाळी अधिवेशन ‌: विरोधक – सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की, राज्यासाठी लाजीरवाणी घटना

मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत आले. सरकारचे हे पहिलेच पावसाळी अधिवेशन पार पडत असून अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आज आंदोलनावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यामध्ये ही धक्काबुक्की झाली आहे. 

महाराष्ट्रात एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह अनेक मुद्दे महत्त्वाचे असताना लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची लाजीरवाणी कृती घडणं राज्याची मान शरमेने खाली घालणारी आहे.

सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले. त्याचवेळी विरोधक देखील पायऱ्यांवर घोषणा देत आंदोलन करत होते. यावेळी अचानक एकनाथ शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या सुरुवातीला शाब्दीक वाद झाले आणि त्यानंतर हे प्रकरण थेट धक्काबुक्कीपर्यंत गेले. 

दरम्यान, अजित पवार यांनी समजुतीचा मार्ग काढत सुरू असलेला वाद थांबवला. या वादात अमोल मिटकरी यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसून आले. शिंदे गटातील नेत्यांनी सर्वात प्रथम शिवीगाळ केल्याचा आरोप मिटकरींनी माध्यमांशी बोलताना केला आहे.